लडाखमध्ये भारत आणि चीनमधील सैनिकांमध्ये चकमक झाली असून यावेळी तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. यावेळी कोणताही गोळीबार झालेला नसून दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर आले होते. यावेळी झालेल्या हिंसाचारात भारताचा एक अधिकारी आणि दोन शहीद झाले आहेत. यानंतर महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं असून शहीदांच्या कुटुंबीयांसोबत आपण उभं राहिलं पाहिजे असं म्हटलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे की, “लडाखमध्ये नेमकं काय झालं आहे याची माहिती आपल्याला मिळेलच. तो आपला हक्क आहे. पण सध्या आपण शहिदांच्या कुटुंबीयांसोबत उभं राहण्याची आणि त्यांच्या दु:खात सहभागी होण्याची वेळ आहे. तसंच भारतीय लष्कराच्या पाठीशीही ठामपणे उभं राहिलं पाहिजे”.

आणखी वाचा- भारत-चीन चकमक: लडाखच्या गलवान खोऱ्यात काल रात्री काय घडलं?

भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्य समोरासमोर आले. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांसमोर आले होते. यावेळी झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. यामुळे तणाव वाढण्याची भीती आहे.

आणखी वाचा- ४५ वर्षानंतर चीन सीमेवर वाहिले रक्त, भारताचे तीन वीरपुत्र शहीद

भारतीय लष्कराकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकारी तणाव वाढू नये यासाठी आपापसांत चर्चा करत आहेत. दरम्यान भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन वेळा सीमारेषा ओलांडली आणि सैन्यावर हल्ला केला असा दावा चीनच्या ग्लोबल टाइम्सने परराष्ट्र मंत्र्यांच्या हवाल्याने केला आहे. यानंतर दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले असंही त्यांनी सांगितलं आहे. यानंतर चीनने भारतीय अधिकाऱ्यांकडे निषेध नोंदवला असून सीमेवरील परिस्थिती बिघडेल असं काही करु नये असं म्हटलं आहे.