उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा आपल्या ट्विट्समुळे कायम चर्चेत असतात. वेगवेगळ्या विषयांवर ते ट्वीट्स करत असतात. करोनाच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणारे ट्वीट्स केल्यानंतर आता त्यांनी भारतातील करोनाच्या परिस्थितीविषयी थेट जागतिक माध्यमांना सुनावलं आहे. भारतातील करोनाच्या चिंताजनक परिस्थितीविषयी वृत्तांकन करणाऱ्या जागतिक माध्यमांनी भारताचं यश देखील दाखवावं, असं म्हणत आनंद महिंद्रा यांनी एक टाईम लॅप्स व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये भारतात झालेल्या लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली आहे.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केलेल्या २८ सेकंदांच्या टाईम लॅप्स व्हिडीओ क्लिपमध्ये १ फेब्रुवारीपासून ११ ऑगस्टपर्यंत भारतात कशा पद्धतीने लसीकरणाचं प्रमाण वाढत गेलं, याचा आलेख देण्यात आला आहे. त्यासोबतच, जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरण कसं वाढत गेलं, हे देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आत्ता जगात सर्वाधिक लसीकरण भारतात झाल्याचं या क्लिपमधील आलेखांवरून दिसत आहे.

पी व्ही सिंधूला ‘थार’ भेट देण्याची युजरची मागणी; आनंद महिंद्रा म्हणाले, “तिच्या गॅरेजमध्ये….”

जागतिक माध्यमांनी हे दाखवावं!

दरम्यान, या व्हिडीओ क्लिपसोबत आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या संदेशामध्ये जागतिक माध्यमांना कानपिचक्या दिल्या आहेत. “हे थक्क करून सोडणारं यश आहे. आपल्या लोकसंख्येमुळे टक्केवारीच्या बाबतीत हे प्रमाण कमी दिसतंय. पण तरीही, जागतिक माध्यमांनी भारतानं मिळवलेलं हे प्रचंड यश दाखवायला हवं. जेवढे कष्ट आपलं अपयश दाखवण्यासाठी ते घेतात, तेवढेच कष्ट घेऊन त्यांनी हे यश देखील दाखवावं”, असं त्यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

 

ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा याला पदक जिंकल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्राला सरप्राईज देत त्याला XUV 700 ही आलिशान कार देण्याची थेट ट्विटरवरच घोषणा केली होती!

 

या ट्विटमध्ये सूरत सायबर सेलमधील एका व्यक्तीने त्यांना टॅग करून नीरज चोप्रासाठी ही कार देण्याची मागणी केली. आनंद महिंद्रांनी लागलीच तिथेच रिप्लाय करून ही मागणी मान्य करत नीरज चोप्राला कार देण्याची घोषणा केली.