xजम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार जवान शहीद झाले असून यात मेजर पदावरील अधिकाऱ्याचा समावेश आहे. या वृत्तानंतर महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक भावनिक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आम्ही सर्व भारतीय जवनांच्या कुटुंबीयांबरोबर असल्याचे म्हटले आहे.

आज पहाटे (सोमवार १८ फेब्रुवारी २०१९) रोजी पुलवामा येथील पिंगलान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम सुरु केली. या शोधमोहीमेदरम्यान दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जवान जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आज सकाळीच हे वृत्त आल्याने अवघा देश पुन्हा एकदा हळहळला आहे. आनंद महिंद्रांनीही याबद्दल दु:ख व्यक्त करत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लष्कारातील कुटुंबियांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘रोज सकाळी आपण झोपेतून उठतो तेव्हा आजचा दिवस नेहमीसारखाच असेल अशी आपली अपेक्षा असते. पण वाईट बातमी ऐकण्याची मानसिक तयारी ठेऊनच लष्करामधील जवानांचे कुटुंबीय सकाळी झोपेतून उठतात मात्र दिवस नेहमीसारखाच असावा अशी त्यांची इच्छा असते. पण आज तसे झाले नाही… आम्ही तुमच्या सोबत आहोत.’

या ट्विटमधून महिंद्रा यांनी सिमेवर लढायला जाणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या धैर्याला सलाम केला आहे. दरम्यान शहीद झालेल्या चार जवानांमध्ये मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. या चकमकीत एक नागरिकही जखमी झाल्याचे समजते.