ज्यांना केवळ मुलगे किंवा केवळ मुलीच आहेत अशा जोडप्यांची जनुकीय (डीएनए) चाचणी करून त्यांच्या समस्येवर ‘संशोधन’ करण्यासाठी गुजरात सरकार एक विशेष रुग्णालय उभारणार असल्याचे मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी शनिवारी सांगितले. ‘संतती’ हे अनेक कुटुंबांमधील बेबनावाचे मोठे कारण असल्याची कल्पना असल्यानेच आपण हे करत असल्याचे त्या म्हणाल्या.
एखाद्या जोडप्याला दोन मुली असतील आणि तिसरीही मुलगी झाली, तर पुरुष पुन्हा लग्न करण्याची भाषा करतो आणि त्यामुळे स्त्रीवर मोठे मानसिक दडपण येते. मतभेदांमुळे घटस्फोटाचीही वेळ येते. पुरुषात दोष असला तरीही महिलेलाच दोषी ठरवले जाते, असे छोटा उदेपूरमधील पावी जेतपूर येथे गुजरातच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाल्या. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी अहमदाबादमध्ये एक विशेष रुग्णालय उभारण्याचे सरकारने ठरवले आहे. ज्यांना केवळ मुलीच होतात, मुलगा नाही किंवा ज्यांना मुलगेच असून मुलीची इच्छा आहे अशा जोडप्यांबाबत येथे संशोधन व परीक्षण केले जाईल. सुदृढ अपत्यप्राप्तीसाठी पालकांच्या जनुकांची चाचणी केली जाईल. या रुग्णालयासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून ते येत्या आठ महिन्यांत तयार होईल, असे पटेल यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या आधारे, पालकांच्या जनुकीय चाचणीच्या मदतीने महिला व मुलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवता येऊ शकतात.
– आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री