नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी ७३ वर्षीय आनंदीबेन पटेल यांची अपेक्षेप्रमाणे निवड करण्यात आली. गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळणार आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी १२ वर्षे राहिल्यानंतर मोदी पंतप्रधानपदावर आरूढ होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी मोदींच्या समर्थक मानल्या जात असलेल्या आनंदीबेन पटेल यांच्या नावावर आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
मोदींच्या उपस्थितीत आपली नेतेपदी निवड झाल्याबद्दल आभार मानताना आनंदीबेन भावनाविवश झाल्या. शेतकऱ्याच्या मुलीला हा बहुमान दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. अटलबिहारी वाजपेयी,  अडवाणी आणि मोदी यांचेही त्यांनी आभार मानले. मोदींनी आपल्याला नेहमीच प्रोत्साहन दिले, असे सांगत मोदी हे २१व्या शतकातील नेते आहेत आणि येणाऱ्या अनेक पिढय़ांपर्यंत त्यांचे नाव कायम राहील, असे त्या म्हणाल्या.