गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी बुधवारी  मुख्यमंत्री पदाचा राजीनामा गुजरातचे राज्यपाल ओपी कोहली यांच्याकडे सुपुर्द केला. नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे सांगत आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे फेसबुकवरुन जाहीर केले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातची सुत्रे अमित शहा घेतील, अशी चर्चा राजकिय वर्तुळात रंगली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाने शहाच्या अध्यक्षतेखाली मिळवलेले यश पाहता गुजरातच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकत नसल्याचे भाजप नेते वेंकय्या नायडू यांनी बुधवारी स्पष्ट केले. गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपाचे  गुजरात प्रदेश अध्यक्ष विजय रूपाणी यांचे नाव सध्या चर्चेत आहे. त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री नीतीन पटेल यांच्या नावाची देखील चर्चा रंगत आहे. नवीन मुख्यमंत्री पदाची निवड करण्यासाठी भाजपचे अमित शहा गुरुवारी अहमदाबादकडे रवाना होणार आहेत. शुक्रवारी अमित शहा संसदीय बैठक घेतल्यानंतर गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव घोषीत करण्याची शक्यता आहे. यावेळी अमित शहा यांच्यासोबत केद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे.