गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेण्याची आयती संधी काँग्रेससाठी शनिवारी चालून आली. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक प्रमुख मंत्री आनंदीबेन पटेल यांच्या पतीने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी यांना लक्ष्य केले.
जवळच्या सहकाऱ्यांचाच मोदी यांच्यावर विश्वास नसेल तर जनतेने तरी तो का ठेवावा, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. मोदी अथवा भाजपने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.  
आनंदीबेन पटेल या मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्या मानल्या जातात. त्या आपले पती मफतलाल यांच्यापासून विभक्त झाल्या असून २० वर्षे ते वेगळे राहत आहेत. मफतलाल यांनी ‘आप’मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडिया तसेच सरचिटणीस शकील अहमद यांनी ट्विटरवरून मोदींवर टीका केली. अहमद म्हणाले, मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ महिला मंत्री आनंदीबेन यांचे पती ‘आप’मध्ये प्रवेश घेणार हे आता निश्चित झाले आहे. सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांचाच मोदींनी विश्वास गमावला असेल तर देशातील जनता तरी मोदींवर कसा विश्वास ठेवेल. मोदींना पंतप्रधानपद मिळणे, हे देशासाठी घातक आहे, या पंतप्रधानांच्या विधानाशी मी पूर्णपणे सहमत आहे.
दरम्यान मफतलाल पटेल यांनी गुजरातमधील ‘आप’च्या नेत्यांची भेट घेतली असून ते सोमवारी ‘आप’मध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. भाजपविरोधात बंड करून पराभूत झालेल्या कनू कलसारिया यांनीही नववर्षांच्या पहिल्याच दिवशी ‘आप’मध्ये प्रवेश केल्याने भाजपला धक्का बसला आहे.
राज्यात मोर्चेबांधणी
‘आप’ने गुजरातमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून त्यांच्या सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा या पक्षाच्या नेत्यांनी केला. गुजरातमध्ये आतापर्यंत २० हजार नागरिकांनी प्रत्यक्ष तर ५० हजार नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी