बौद्ध धर्माला प्राधान्य, तर इतर समुदायांच्या रक्षणाचीही ग्वाही

श्रीलंकेचे सातवे अध्यक्ष म्हणून चीनमित्र गोताबाया राजपक्ष यांचा शपथविधी प्राचीन बौद्ध स्तूपात सोमवारी झाला. सिंहली बहुसंख्याकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने हा शपथविधी या ठिकाणी घेण्यात आला. बौद्ध धर्माला प्राधान्य देतानाच इतर समुदायांचे रक्षण केले जाईल असे गोताबाया राजपक्ष यांनी सांगितले.

रूवानवेली सेया या स्तूपाच्या ठिकाणी हा शपथविधी झाला. या धार्मिक ठिकाणी जगातून आणलेले काही बौद्ध अवशेष असून हा स्तूप कोलंबोपासून २०० कि.मी अंतरावर अनुराधापुरा येथे आहे.

राजपक्ष हे कोलंबोबाहेर  शपथविधी करणारे पहिले अध्यक्ष ठरले आहेत. पांढरा वेष परिधान केलेल्या राजपक्ष यांनी सरन्यायाधीश जयंत जयसुरिया यांच्या उपस्थितीत अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी त्यांना अध्यक्षीय सचिव उदय आर सेनेविरत्ने यांनी अधिकारपदाची शपथ दिली.

श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमचा (एलटीटीई)  लढा मोडून काढण्यात राजपक्ष यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. गोताबाया राजपक्ष हे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्ष यांचे भाऊ आहेत. नंतर ते महिंदा राजपक्ष यांची पंतप्रधानपदी नेमणूक करणार आहेत. गोताबाया हे लष्करात कर्नल होते. नंतर १९९२ मध्ये  ते अमेरिकेत गेले. एलटीटीईला संपवण्यात गोताबाया यांचा मोठा वाटा मानला जातो. निर्णय क्षमता व खंबीर नेतृत्व या दोन गुणांमुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.

अध्यक्षीय निवडणुकीत सर्वोच्च बौद्ध धर्मगुरूंनी पाठिंबा दिल्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. सिंहली लोकांचाही या विजयात मोठा वाटा आहे. सिंहली लोकांच्या पाठिंब्यावर निवडून येईन असे वाटत होते. अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा होती, पण तो मिळाला नाही. पण असे असले तरी मी सर्वाचा अध्यक्ष असेन याची ग्वाही देतो. बौद्धधर्मीयांना प्राधान्य देतानाच सर्व धर्मीयांचे रक्षण केले जाईल.

– गोताबाया राजपक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष, श्रीलंका