अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल बुधवारी रेल्वेकडून सादर करण्यात आला. पुलाची गंजलेली अवस्था, त्यावर लटकत असलेल्या मोठ्याल्या केबल्सचा ताण आणि पेव्हर ब्लॉक्समुळे वाढलेले वजन या कारणांमुळे हा पुल कोसळ्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सर्कलचे रेल्वे सुरक्षा आयुक्त सुशील चंद्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करून हा अहवाल सादर केला आहे.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे अंधेरी स्थानकातील ३ क्रमांकाचा ओव्हर ब्रीज कोसळला होता. या पुलाला आधार देणाऱ्या कमानीच्या कोपऱ्यात थुंकल्याने गंज चढला होता. तसेच पश्चिम रेल्वेची परवानगी न घेता महापालिकेने यावर जाड केबल्स, वाळू आणि पेव्हर ब्लॉक टाकल्याने त्याचा वजनाचा भार पडून हा पूल कोसळला. या पुलाची रचनेनुसार हा अतिरिक्त भार पेलवण्याची क्षमता नव्हती, असेही या अहवालात म्हटले आहे.

३ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली होती. हा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता तर चार जण गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने त्यावेळी खालून लोकल ट्रेन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले होते ढिगारा बाजूला केल्यानंतर तब्बल ६ तासांनंतर या मार्गावरील वाहतुक पुर्ववत झाली होती. पावसामुळे या कामात अनेकदा अडथळे येत होते.