आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या दिलदारपणाचे एक उदहारण समोर आले आहे. त्यांनी विमानतळावर कॅन्सरच्या उपचारासाठी मदत मागणाऱ्या एका १५ वर्षाच्या मुलाला २० लाख रुपयांची सरकारी मदत मिळवून दिली. खर्चाचा इतका मोठा आकडा पाहून नीरजच्या कुटुंबाने अपेक्षाच सोडून दिली होती.

नीरज कॅन्सरने पीडित आहे. डॉक्टरांनी त्याच्या उपचारावर २० लाख रुपयांचा खर्च सांगितला होता. नीरजच्या कुटुंबाकडे इतका पैसा नव्हता. नीरजचे कुटुंब ग्नानपूरम येथे राहते. त्याचे वडिल अप्पला नायडू मजुरीचे काम करतात. नीरजची आई भाजी विकून घर चालवते. या कुटुंबाला कॅन्सरच्या उपचाराचा इतका मोठा खर्च परवडणारा नव्हता.

नीरजच्या कुटुंबाची ही परिस्थिती पाहून भाऊ आणि मित्रांनी काही फलक बनवले. त्या फलकावर नीरजच्या उपचारासाठी २० लाख रुपयांची मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मदतीचे आवाहन करणारे हे पोस्टर्स त्यांनी काही खांबांवर चिकटवले होते. पण त्याचा विशेष काही फायदा झाला नाही.

वायएसआरसीपीच्या काही नेत्यांच्या नजरेत हे पोस्टर्स आले. त्यातील केके राजू यांनी नीरजच्या कुटुंबाला एअरपोर्ट जवळ मदत मागण्याची कल्पना सुचवली. अनेक मोठया व्यक्तींचा विमानतळावरुन प्रवास सुरु असतो. स्वत: जगनमोहन सुद्धा अनेकदा विमानतळावर येत असतात.

एकदा जगनमोहन विमानतळावरुन जात असताना २५ ते ३० लोक हातात बॅनर घेऊन उभे होते. ते कॅन्सरग्रस्त नीरजच्या उपचारासाठी मदत मागत होते. जगनमोहन यांची नजर या बॅनरवर पडल्यानंतर सरकार उपचाराचा खर्च उचलेल असे त्यांनी जाहीर केले. त्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन नीरजच्या उपचारांचा खर्च उचलण्यास सांगितले.