12 December 2017

News Flash

आंध्रचे हेलिकॉप्टर भस्मसात

व्यावसायिक वापर नसलेल्या येथील बेगमपेठ विमानतळावर उभे करण्यात आलेले आंध्र प्रदेश सरकारचे एक हेलिकॉप्टर

पीटीआय, हैदराबाद | Updated: December 19, 2012 6:20 AM

व्यावसायिक वापर नसलेल्या येथील बेगमपेठ विमानतळावर उभे करण्यात आलेले आंध्र प्रदेश सरकारचे एक हेलिकॉप्टर सोमवारी रात्री आगीत भस्मसात झाले.
या आगीत अन्य पाच हेलिकॉप्टर्सही जळून खाक झाली. केवळ मुख्यमंत्र्यांसाठी वापरण्यात येणारे हे विशेष हेलिकॉप्टर आगीत भस्मसात झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
शमशाबाद येथे चार वर्षांपूर्वी नवे विमानतळ सुरू झाल्यापासून या विमानतळाचा व्यावसायिक वापर थांबवण्यात आला होता. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या विमानांची उड्डाणे तसचे हवाई अकादमीच्या प्रशिक्षणासाठीच सध्या या विमानतळाचा वापर होतो. आंध्र प्रदेश सरकारचे हेलिकॉप्टरही येथेच उभे करण्यात येते. सोमवारी रात्री या विमानतळावर मोठी आग लागल्याने एकूण सहा हेलिकॉप्टर भस्मसात झाली. आगीच्या ठिकाणाहून काही स्फोटांचे आवाजही ऐकू आल्याची माहिती आसपासच्या रहिवाशांनी दिली. अग्निशमन दलाच्या १५ बंबांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही.
आंध्र सरकारने ६३ कोटी रुपये खर्चून हे हेलिकॉप्टर विकत घेतले होते, त्याचा विमा उतरवण्यात आल्याने सरकारला भरुदड पडणार नाही, मात्र ही घटना दुर्दैवी आहे, असे मत एका मंत्र्याने व्यक्त केले.    

First Published on December 19, 2012 6:20 am

Web Title: andhra helicopter burned