मद्याच्या नशेत असलेल्या जावयाच्या तोंडून सत्य ऐकल्यानंतर संतापलेल्या सासरेबुवांनी थेट जावयाचा शिरच्छेद केला. त्यानंतर जावयाचं कापलेलं मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले व गुन्ह्याची कबुली दिली. आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील धारा जगन्नाधापूरम गावामध्ये शनिवारी ही धक्कादायक घटना घडली.
पल्ला सत्यनारायणा असे आरोपीचे नाव आहे. त्याने लाचचानाची हत्या केली. लाचचानाचे सत्यनारायण यांच्या मुलीबरोबर लग्न झाले होते. पण दहा महिन्यांपूर्वी तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या लग्नासाठी माझ्या मुलीची हत्या केल्याची लाचचानाने कबुली दिल्यानंतर मी त्याची हत्या केली असे सत्यानारायणा याने पोलिसांना सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
आणखी वाचा- तीन कोटींची संपत्ती हडपल्यानंतर तीन मुलांनी जन्मदात्यास रस्त्यावर सोडले
लाचाचानाला दोन मुली आहेत. आईचा मृत्यू झाल्यापासून त्या आपल्या आजी-आजोबांकडे म्हणजे सत्यानारायण यांच्याजवळ राहत आहेत. मुलीच्या मृत्यूनंतर दहाव्या महिन्यातील एक विधी करायचा असल्याने सत्यानारायणा यांनी लाचाचानाला त्यांच्या घरी बोलावले होते. लाचाचाना तिथे दारुच्या नशेत पोहोचला व दुसरे लग्न करण्यासाठी आपण पहिल्या पत्नीची हत्या केली अशी कबुली त्याने दिली.
आणखी वाचा- धक्कादायक: अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार; तीन जणं ताब्यात
मी माझ्या दोन मुलींना सोबत घेऊन जायला आलो आहे. त्यांची सुद्धा मी अशीच हत्या करणार असे त्याने सत्यानारायणा यांना सांगितले. जावयाच्या तोंडून हे ऐकल्यानंतर चिडलेल्या सत्यानारायण यांनी धारदार तीक्ष्ण हत्यार उचलले व लाचाचानाचा शिरच्छेद केला. त्यानंतर ते जावयाचं मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले व गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 12:38 pm