News Flash

कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्या परिवहन उपायुक्ताला अटक

या मालमत्तेची बाजारभावाने किंमत यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचा अंदाज आहे.

| May 1, 2016 01:51 am

उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अडीच कोटी रुपयांची अधिक मालमत्ता सापडलेल्या एका परिवहन उपायुक्ताला आंध्र प्रदेशच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या मालमत्तेची बाजारभावाने किंमत यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचा अंदाज आहे.
सध्या काकिनाडा येथे कार्यरत असलेले परिवहन उपायुक्त ए. मोहन यांचे काकिनाडामधील घर, तसेच आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटकमधील त्यांचे मित्र व नातेवाईक यांच्या नावे असलेल्या मालमत्तांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) २८ एप्रिलपासून छापे घालण्यास सुरुवात केली. या छाप्यांमध्ये मोहन यांचे कोमपल्ली व मधापूर येथील प्रत्येकी चार भूखंड, सेरिलिंगमपल्ली येथील १ भूखंड, पंजागुट्टा येथील एक फ्लॅट, हैदराबादच्या उच्चभ्रू ज्युबिली हिल्स भागात एक चार मजली इमारत, तिरुपती येथे एक भूखंड, तसेच प्रकाशम, नेल्लोर व हैदराबाद येथे ५४.५ एकर शेती इतकी मालमत्ता आढळल्याचे एसीबीने एका पत्रकात सांगितले.
याशिवाय २ किलो सोन्याचे दागिने, ५ किलोच्या चांदीच्या वस्तू, ४ लाखांच्या मुदतठेवी, बँकेतील ३ लाखांची रक्कम, ७ लाख रुपयांच्या गृहोपयोगी वस्तू, ८३ हजार रुपये रोख आणि एक मारुती एर्टिगा कारदेखील मोहन यांच्याकडे सापडली. या सर्व मालमत्तांची एकूण किंमत २.३० कोटी रुपये असल्याचे एसीबीच्या महासंचालक कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मात्र, या मालमत्तेची बाजारभावाने किंमत किती याचा त्यात उल्लेख करण्यात आलेला नाही. ज्युबिली हिल्स येथील चार मजली इमारतच सध्याच्या दराने कोटय़वधी रुपयांची आहे. तसेच निरनिराळ्या ठिकाणच्या भूखंडांची किंमतही बरीच जास्त आहे. मोहन यांची हैदराबाद व इतर ठिकाणच्या बँकांमधील खाती आणि लॉकर्स अद्याप उघडण्यात आलेली नाहीत, असे एसीबीने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 1:51 am

Web Title: andhra pradesh acb raids deputy transport commissioner seizes assets worth rs 800 crore
Next Stories
1 बांगलादेशात हिंदू रहिवाशाची आयसिसकडून निर्घृण हत्या
2 ला निना परिणामामुळे अधिक पावसाने नुकसानीची शक्यता
3 माजी हवाईदल उपप्रमुखांची चौकशी
Just Now!
X