हजारो घरांचे नुकसान.. लाखो रहिवासी बेघर.. निवासी छावण्यांमध्ये राहण्याची वेळ.. वीज, संपर्क यंत्रणा, वाहतूक यंत्रणेचा अक्षरश: बोऱ्या! हुडहुड चक्रीवादळाच्या तडाख्याने आंध्र प्रदेश आणि ओदिशा या राज्यांतील किनारपट्टय़ा अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या. या चक्रीवादळाचा तडाखा दोन्ही राज्यांतील किनारपट्टीवरील तब्बल १२ जिल्ह्यांना बसला आहे. विशाखापट्टणम शहरामध्ये तर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे.
या चक्रीवादळाने २१ बळी घेतले असून, तब्बल सात लाख रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तब्बल ५० हजार घरांचे नुकसान झाले असून, वीज यंत्रणा आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. चक्रीवादळामुळे आलेल्या पुरामुळे रस्ते वाहून गेले असून, त्यामुळे वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे.
केंद्र सरकार दोनही राज्यांतील परिस्थितीवर नजर ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी राज्यातील परिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली असून, मंगळवारी ते विशाखापट्टणम शहराला भेट देणार आहेत. चक्रीवादळामुळे बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही याबाबत चर्चा केली.
आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरील चार जिल्ह्यांना आणि ओदिशातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, तिथे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशाखापट्टणममध्येही जोरदार वारे वाहत असून, मुसळधार पाऊस पडत आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.

हुडहुडचे २१ बळी
हुडहुड चक्रीवादळाने २१ जणांचे बळी घेतले असून, विशाखापट्टणममध्ये ही संख्या जास्त असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले. विशाखापट्टणम जिल्ह्यात १५, विझिनगरम जिल्ह्यात पाच, तर श्रीकाकुलम जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. अनेकांचा मृत्यू अंगावर झाड पडल्याने झाल्याचे राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे विशेष आयुक्त के. हेमावती यांनी सांगितले.

उद्ध्वस्त जिल्हे
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, श्रीकाकुलम, विझिनगरम, पूर्व गोदावरी आणि ओदिशामधील गजापती, कोरपत, मलकानगिरी, रायगडा या जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

विमानतळाचेही नुकसान
हुडहुड चक्रीवादळाचा तडाखा विशाखापट्टणमच्या विमानतळालाही बसला आहे. विमानळाच्या छताचे नुकसान झाले असून, विमानतळाचा काही भाग बंद करण्यात
आला आहे.

* आंध्र प्रदेश सरकारने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाच पथके तयार केली आहेत. वीज व संपर्क यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी आणि नुकसानग्रस्त भागातील मदत मोहिमांचा आढावा हे पथक घेणार आहे.
* केंद्र सरकारने २००० कोटींची मदत केली असून, राष्ट्रीय आपत्तीही जाहीर केली आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.
* हुडहुडची तीव्रता कमी झाली असून, ते छत्तीसगढच्या किनारपट्टीकडे सरकले आहे. त्यामुळे या राज्यालाही या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
* नुकसानग्रस्त भागासाठी ‘रिलायन्स कम्युनिकेशन’ने विशेष कॉल सेंटर निर्माण केले आहे.

येथे अन्न नाही, पाणी नाही, वीज नाही. वीज आणि संपर्क यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे. आम्हाला रेडिओवर अवलंबून राहवे लागत आहे. येथे पेट्रोलही मिळत नाही. रस्तेचे वाहून गेल्याने वाहने चालविताही येत नाहीत. अशा परिस्थितीत एक दिवस व्यतीत करणेही अवघड आहे.
– विशाखापट्टणममधील रहिवासी.