कालव्यामध्ये बस पडल्यामुळे आंध्रप्रदेशात १० जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेशात कृष्णा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. ३८ प्रवाशांना घेऊन जात असलेली दिवाकर ट्रॅव्हल्सची बस कालव्यात पडली. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही बस भुवनेश्वरकडून येत होती.

अपघात ग्रस्तांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. जखमींना विजयवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. बसचा चालक आदिनारायण स्वामीला झोप अनावर झाली आहे असे वाटत होते अशी माहिती प्रवाशांनी पोलिसांनी दिली.
उप-मुख्यमंत्री एन. सी. राजप्पा यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांची विचारपूस केली आहे. मृतांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे. या बसमधील प्रवासी हे प्रामुख्याने विशाखापट्टणम, भुवनेश्वर, श्रीकुलम आणि हैदराबाद येथील होते. दिवाकर ट्रॅव्हल्स एजन्सी ही तेलुगु देसम पार्टीचे खासदार जे. सी. दिवाकर रेड्डी यांच्या मालकीची आहे.
ऑक्टोबर २०१३ मध्ये दिवाकर ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला होता. बंगळुरू ते हैदराबाद प्रवासादरम्यान व्हॉल्वो बसला आग लागली. हा अपघात महबूबनगर जिल्ह्यात कोथाकोटा येथे झाला होता. या अपघातामध्ये ४५ प्रवासी ठार झाले होते.