करोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाची विटंबना झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात आता आंध्र प्रदेश सरकारने करोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. “कोणत्याही हॉस्पिटलने करोना रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार देऊ नये, जर असं आढळलं तर त्या हॉस्पिटलविरोधात कठोर कारवाई केली जाईल”, असा इशारा मुख्यमंत्री रेड्डी यांनी दिला. करोनाग्रस्तांच्या मृतदेहाची विटंबना होत असल्याच्या प्रकारावर बोलताना, “करोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांना त्याबाबतचा आदेश लवकर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत” असं मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले. यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “प्रतिबंधात्मक उपायांची गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचं म्हटलं. प्रत्येक क्वारंटाइन सेंटरने तक्रारींसाठी कॉल सेंटरचा नंबर रुग्णांना द्यावा आणि अधिकाऱ्यांनी त्याद्वारे नियमितपणे अभिप्राय घ्यावेत”, असंही रेड्डी म्हणाले.

करोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाची विटंबना झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. संसर्ग होण्याच्या भीतीमुळे अनेकदा करोनाग्रस्ताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही कोणी तयार होत नाही. अशात आता आंध्र प्रदेश सरकारने करोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये करोनाचा फैलाव वेगाने होत असून करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.