वाढत्या इंधनदरामुळे त्रस्त असलेल्या जनतेला राजस्थान पाठोपाठ आंध्र प्रदेश सरकारनेही दिलासा दिला आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रूपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज केली. ही दरकपात मंगळवार सकाळपासून लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजस्थान सरकारनेही रविवारी ४ टक्क्यांनी मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात केली होती. दरम्यान, वाढत्या इंधन दराविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी आज पुकारलेल्या भारत बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने इंधन दराबाबत हात वर केले आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रूपयांची कपात करण्यात आल्याचे सांगितले. जनतेवरील भार कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. ही दरकपात उद्या सकाळपासून लागू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभमीवर व्हॅटमध्ये कपात केल्याची चर्चा रंगली आहे. तिथे रविवारी मध्यरात्रीपासूनच दरकपातीचा निर्णय लागू झाला आहे.