देशभरात लॉकडाउन आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडण्यावरही निर्बंध आले आहेत. बाहेर पडायचं असेल तर मास्क लावणंही सक्तीचं आहे. अशा सगळ्या वातावरणात आपल्या प्रियकराशी लग्न करायचं म्हणून त्याची प्रेयसी ६० किमी चालत प्रियकराच्या गावी पोहचली आहे.

आंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यातील ही घटना आहे. हनुमान जंक्शन या ठिकाणी चितिकला भवानी ही १९ वर्षीय मुलगी राहते. तिच्या घरापासून ६० किमी अंतरावर तिचा प्रियकर साई पुन्नैय्या राहतो. साई पुन्नैय्या हा एदिपल्ली गावातला रहिवासी आहे. भवानी आणि साई यांचं मागील चार वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे. आपल्या नात्याबद्दल या दोघांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी सांगितलं. मात्र दोघांच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नाही. भवानीच्या कुटुंबीयांनी तर लग्नाला नकार दिला. त्यानंतर या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी तशी योजनाही आखली. मात्र करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशात लॉकडाउन जाहीर झाला. त्यामुळे हे दोघे आपल्या घरांमध्येच अडकले. मात्र लॉकडाउनचे काही दिवस झाल्यानंतर भवानीने साईच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. ती ६० किमीची पायपीट करत साईच्या घरी पोहचली. या दोघांनी लग्नही केलं. news 18 हिंदीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

“आम्ही लॉकडाउन संपल्यानंतर लग्न करणार होतो. मात्र सध्या लॉकडाउनचा कालावधी वाढू शकतो असं दिसतंय. सरकारकडून लॉकडाउन वाढवला जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेच मी साईच्या घरापर्यंत चालत आले.” असं भवानीने सांगितलं आहे.

लग्न झाल्यानंतर या दोघांच्या अडचणी वाढल्या आहेत कारण भवानीच्या घरातल्यांनी या दोघांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. या दोघांनी या प्रकाराची माहिती पोलीस ठाण्यात दिली. दोघेही सज्ञान आहेत. पोलिसांनी भवानीच्या कुटुंबीयाचं काऊन्सिलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भवानीच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. लॉकडाउनच्या काळात केलेलं हे लग्न दोघांना चांगलंच लक्षात राहिल यात शंकात नाही.