आंध्र प्रदेश सरकारने ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय गटातील गरीब जनतेसाठी दोन लाख घरे मंजूर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एन. चंद्रशेखर नायडू यांनी केली.
अनुसूचित जातीमधील नागरिकांसाठी दीड लाखांची तर अनुसूचित जमातीतील नागरिकांसाठी १.१० लाख रुपयांची सबसिडी देण्यात येणार असून उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी स्वत: भरायची आहे, अशी माहिती नायडू यांनी तेलुगू देसम पक्षाच्या विशेष बैठकीत दिली. ते म्हणाले की, शहरी भागातील गरीब जनतेलाही स्वत:चे घर घेता यावे यासाठी अशा प्रकारच्या काही योजना आणून त्यांना कर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या घरांना नियमित करण्यात येणार आहे.
नायडू यांनी या वेळी शेतकरी, महिला, वरिष्ठ नागरिक, विधवा आणि अपंग यांच्यासाठी कल्याणकारी योजना आखण्याबाबत पुनरुच्चार केला.
शेतकऱ्यांना बँकेकडून २४ हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिला व बालकल्याण विकास कार्यक्रमांतर्गत महिलांनाही १० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.