शिक्षिकेसोबत गैरवर्तन आणि छेडछाड केल्याच्या आरोपाखाली हैदराबाद पोलिसांनी रविवारी सकाळी आंधप्रदेश सरकारमधील मंत्र्याच्या मुलाला अटक केली. सुशील रावेला असे आरोपीचे नाव असून, तो आंध्रप्रदेशचे सामाजिक कल्याण मंत्री रावेला किशोर बाबू यांचा मुलगा आहे.
किशोरबाबू रावेला यांच्या पुत्रासह त्याच्या चालकाला आज सकाळी अटक करण्यात आली. या प्रकरणी २० वर्षीय शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पीडित शिक्षिका गुरूवारी शाळेत जात असताना सुशील रावेला याने मोटारीतून तिचा पाठलाग केला. त्यानंतर शेरेबाजी करीत मोटारीत खेचण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा केल्यानंतर पतीसह स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यामुळे सुशीलच्या तावडीतून आपली सुटका झाल्याचे पीडित शिक्षिकेने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सुशील आणि त्याच्या चालकाला पोलिसांनी नोटीस बजावली. त्यानंतर ते दोघेही स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यावर प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्याची आल्याची माहिती बंजारा हिल्स विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उदय कुमार रेड्डी यांनी दिली.