16 November 2019

News Flash

हद्दच झाली ! ईश्वराऐवजी मुख्यमंत्र्यांच्या नावे घेतली आमदारकीची शपथ

आंध्र प्रदेशातील नेल्लोर या ग्रामीण मतदारसंघातून श्रीधर रेड्डी निवडून आले आहेत.

फोटो सौजन्य : ट्विटर श्रीधर रेड्डी

कोण कधी काय करेल याचा नेम नसतो. अगदी असाचा प्रकार आंध्र प्रदेशच्या विधानसभेत घडला आहे. आध्र प्रदेशमधील नवनिर्वाचित आमदार कोटमरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेताना ईश्वराच्या जागी चक्क मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावे शपथ घेतली.

आंध्र प्रदेशातील नेल्लोर या ग्रामीण मतदारसंघातून श्रीधर रेड्डी निवडून आले आहेत. आंध्र विधानसभेतील नव्या सदस्यांनी बुधवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यावेळी हा प्रकार घडला. त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतना ईश्वराऐवजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नावाने शपथ घेतली. त्याचवेळी विधानसभा अध्यक्ष संबांगी अप्पाला यांनी त्यांनी थांबवले. त्यानंतर रेड्डी यांनी ईश्वराच्या नावे शपथ घेतली.

दरम्यान, त्यांना याबाबत विचारले असता मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे आपल्याला ईश्वरासारखेच आहेत. तसेच आपण भावनांच्या आहारी जात मुख्यमंत्र्यांचे नाव घेत शपथ घेतली, असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. यापूर्वी एन.टी. रामाराव यांच्या नावानेही आमदारांनी शपथ घेतली होती, असा दावाही करत त्यांना परवानगी देण्यात आली होती. आपल्याला पद मिळावे म्हणून असे केले नाही. मी आपल्या नेत्याला ईश्वर मानतो यात गैर काय असा सवालही त्यांनी यावेळी केला.

First Published on June 13, 2019 1:49 pm

Web Title: andhra pradesh mla sridhar reddy takes oath name cm jagan mohan reddy jud 87