आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) अजून एका खासदाराने पक्ष सोडण्याचे संकेत दिल्या असल्या कारणाने सध्या पक्ष अडचणीत आला आहे. विजयवाडा येथून टीडीपीचे खासदार असणारे केसिनेनी यांनी ट्विट करत चंद्राबाबू नायडू यांना पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला नियंत्रणात ठेवा असंही म्हटलं आहे

त्यांनी लिहिलं आहे की, “चंद्राबाबू जर तुम्हाला पक्षात माझ्यासारख्या लोकांची गरज नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. मी खासदारपदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देईन. जर माझ्यासारख्या लोकांनी पक्षात राहावं असं वाटत असेल तर कृपा करुन तुमच्या पाळीव कुत्र्याला नियंत्रणात ठेवा”.

केसिनेनी श्रीनिवास यांनी या ट्विटच्या माध्यमातून टीडीपीचे नेते आणि आंध्र प्रदेश विधानपरिषद सदस्य बुद्धा प्रसाद वेंकन्ना यांच्यावर निशाणा साधला आहे. वेंकन्ना हे चंद्राबाबू नायडू यांचे निकटवर्तीय मानले जातात.

टीडीपी खासदार केसिनेनी श्रीनिवास यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना वेंकन्ना यांनी आपण पक्ष आणि पक्ष प्रमुखांसाठी ‘ट्विटर युद्धा’चा अंत करत आहोत असं म्हटलं आहे. वेंकन्ना यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मी समाजातील दुर्बळ गटातून आलेलो आहे. चंद्राबाबू नायडू यांनी मला विधानपरिषद सदस्य केलं आणि त्यासाठी मी त्यांचा विश्वासू आहे. त्यामुळे तुम्ही मला कोणत्याही नावे हाक मारलीत तरी फरक पडत नाही”.

दरम्यान ट्विटरवर झालेल्या शाब्दिक चकमकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. एका ट्विटमध्ये केसिनेनी श्रीनिवास यांनी वेंकन्ना यांची खिल्ली उडवताना ज्या व्यक्तीला चार शब्दही बोलता येत नाही, तो आता ट्विट करत आहेत असा टोला लगावला होता. टीडीपीने १७५ जागांच्या विधानसभेत फक्त २३ जागा जिंकल्या असून लोकसभा निवडणुकीत फक्त तीन जागांवर विजय मिळवला आहे.