पतीने चित्रपट पाहण्यासाठी नेण्यास नकार दिल्याने एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली. रागाच्या भरात महिलेने नदीत उडी मारली. घटनास्थळावर उपस्थित एका सतर्क पोलीस कर्मचाऱ्याने हा प्रकार बघितला आणि त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेचा जीव वाचवला.

आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीला चित्रपटासाठी विचारले. मात्र कामावर जायचे असल्याने त्याने पत्नीला नकार दिला. पतीने नकार दिल्याने महिलेचा संताप अनावर झाला. तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. ती घरातून निघाली आणि थेट गावातील नदीवरील पुलावर गेली. तिने नदीत उडी मारली. मात्र याच दरम्यान स्थानिक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला श्रीनिवासुलू तिथून जात होता. घटना समजताच त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीत उडी मारली आणि महिलेचा जीव वाचवला.

विजयवाडाचे सह-पोलीस आयुक्त बी. व्ही. रमण कुमार यांच्याहस्ते श्रीनिवासुलू यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही महिलेचा जीव वाचवणाऱ्या धाडसी पोलीस कर्मचाऱ्याचा सत्कार केला असून दाम्पत्याचे समुपदेशन केल्याची माहिती रमणकुमार यांनी दिली.