गुजरातमधील पटेल समाजाला ओबीसी संवर्गात आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन आता देशव्यापी करून गुज्जर व कुर्मी यांच्यासारखे समाज मिळून सुमारे २७ कोटी लोकांसाठी आरक्षणाची मागणी करण्याची घोषणा गुजरातमधील आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने रविवारी केली.
बावीस वर्षे वयाच्या हार्दिक पटेल याने राजधानीत विविध समुदायांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर, आंदोलनाची व्याप्ती वाढवून देशाच्या निरनिराळ्या भागात महामेळावे आयोजित करण्याची मनीषा जाहीर केली.

आरक्षण व्यवस्थेमुळे आपला देश ६० वर्षे मागे गेला असून त्यामुळे त्याच्या महाशक्ती बनण्याच्या शक्यतेमध्ये अडथळे येत आहेत, असे सांगून हार्दिकने प्रत्येक समाजातील गरिबांना आरक्षण देण्याचे समर्थन केले. आरक्षणाबाबतचा योग्य आराखडा ज्या वेळी तयार होईल, तेव्हाच आपण आपल्या देशाला नव्या उंचीवर नेऊ शकू, असे तो म्हणाला.
आंदोलकांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल हार्दिकने गुजरात पोलिसांवर टीका केली आणि त्याविरुद्ध सोमवारी मध्य प्रदेशमध्ये महामेळावा घेण्याची घोषणा केली. प्रत्येक समाजातील गरिबांना आरक्षण दिले जावे, अशी मागणी त्याने केली. पटेल समाज संपन्न असल्याचे लोक म्हणतात, परंतु संपूर्ण समाज नाही, तर केवळ ५ ते १० टक्के लोक सधन असल्याचे त्याने सांगितले.
’गुजरातमध्ये जसे आंदोलन झाले आहे, ते आम्ही राष्ट्रीय स्तरावर नेऊ इच्छित असून, सुमारे १२ राज्यांमधील लोक आमच्याशी जोडलेले आहेत.
’भारतातील सर्व पटेलांना आवाहन करण्यासाठी आम्ही लखनौ, जंतरमंतर इ. ठिकाणी महामेळावा आयोजित करू.