मुंबईतील महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराचे लोकसभेत सोमवारी तीव्र पडसाद उमटून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी संतप्त सदस्यांनी केली. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सदस्यांच्या भावनांची दखल घेत आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दिल्लीत गेल्या १६ डिसेंबर रोजी झालेल्या बलात्काराप्रकरणी गुन्हेगारांना अद्याप शिक्षा झालेली नाही, याकडे लक्ष वेधून दोषी आरोपींना शिक्षा करण्यासाठी विशिष्ट कालबद्ध चौकट आखण्यात आली आहे काय, अशी विचारणा विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. तुम्ही एक दोनजणांना फासावर लटकावले तर अशा घटनांना निश्चितच आळा बसेल, असे स्वराज यांनी संतप्त होऊन नमूद केले. सध्या देशभरात अशा घटनांचा जणू पूरच आल्याचे जाणवत असल्याचे त्यांनी खेदपूर्वक सांगितले. स्वराज यांच्या या वक्तव्यास विविध पक्षांच्या सदस्यांनी बाके वाजवून उत्स्फूर्त पाठिंबा दिला. या प्रकरणी महाराष्ट्र सरकार सर्व शक्य ती कारवाई करणार असून आरोपींना अधिकाधिक शिक्षा करण्यासाठी अथक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. या बलात्काराप्रकरणी सर्व पाचही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहास दिली. या प्रकरणी पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केले असून सर्व वैद्यकीय छाननीही झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.