अंगोलास्थित कंपनीत स्फोटात ठार झालेल्या भारतीय कर्मचाऱ्याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी म्हणजेच देवरियात पाठविण्यासाठी सदर कंपनीने मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयाकडून १६ लाख रुपयांची मागणी केली आहे.
बेस्ट अंगोला मेटल कंपनीत काम करणारा सूर्यदेव यादव गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झाला. त्यानंतर १ डिसेंबर रोजी तो मरण पावला. तेव्हापासून त्याचे पार्थिव मिळविण्यासाठी त्याचे कुटुंबीय प्रयत्नशील आहेत.
तथापि, अंगोलाची राजधानी असलेल्या लुआंडातून यादव याचे पार्थिव पाठविण्यासाठी कंपनीने कुटुंबीयांकडे १६ लाख रुपयांची मागणी केली आहे. यादव याचे पार्थिव ओळख पटण्याच्या पलीकडील अवस्थेत असल्याने त्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
त्यामुळे आता यादव याच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती परराष्ट्र  व्यवहार मंत्रालयास करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.