बीएमडब्ल्यू कार म्हणजे प्रतिष्ठेच लक्षण. पण, इतकी महागडी कार कुणी नदीच्या पाण्यात  सोडून दिली तर…? हरयाणामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. जग्वॉरची गाडी मागितली असताना वडिलांनी बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केल्याने रागावलेल्या मुलाने ती नदीत सोडून दिली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने कार बाहेर काढण्यात यश आले.

यमुनानगर जिल्ह्यातील मुकारपूर येथील तरुणाने हा कार नदीत सोडण्याचा पराक्रम केला आहे. त्याचे वडील गावातील मोठे जमीनदार आहेत. त्याने वडिलांकडे जग्वॉरची कार घेऊन देण्याची मागणी केली होती. पण, वडिलांनी बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली. दुसरीच कार गिफ्ट केल्याने या तरुणाला राग आला. त्याने रागाच्याभरात बीएमडब्ल्यू कार जवळच असलेल्या नदीत सोडून दिली. ही कार वाहत जाऊन नदीतील एका झाडाला अडकली. दरम्यान, या आवाजाने परिसरात लोक जमा झाले. अपघात झाला असावा असे समजून त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने कार बाहेर काढली आणि तरुणाच्या वडिलांना कळवले.

नदीत सोडलेली बीएमडब्ल्यू कार थ्री स्टार असून किंमत ६० लाख रूपये असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे कार नदीत सोडतानाचा टिक-टॉक व्हिडीओही या तरुणाने व्हायरल करण्यासाठी तयार केला होता. याप्रकरणात तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी करीत आहेत.