पाकिस्तानचे माजी अंतर्गतमंत्री रेहमान मलिक आणि सत्तारूढ पीएमएल-एन पक्षाचे हिंदुधर्मीय लोकप्रतिनिधी यांना पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) विमानातील संतप्त प्रवाशांनी सोमवारी चांगलाच दणका दिला. मलिक आणि सदर लोकप्रतिनिधी विलंबाने पोहोचल्याने विमानाच्या उड्डाणास तब्बल दोन तासांचा विलंब झाला आणि त्यामुळे विमानातील अन्य प्रवाशांनी या दोन लोकप्रतिनिधींना विमानात प्रवेश करण्यासच मज्जाव करण्याची घटना सोमवारी घडली.
पीआयएचे पीके-३७० हे विमान सोमवारी कराचीहून इस्लामाबादला जाणार होते. रेहमान मलिक आणि डॉ. रमेशकुमार वकवाणी हे लोकप्रतिनिधी याच विमानातून प्रवास करणार होते. विमानाच्या उड्डाणाची नियोजित वेळ टळून गेली तरी रेहमान मलिक आणि डॉ. रमेशकुमार वकवाणी हे न पोहोचल्याने तब्बल दोन तास विमान थांबवून ठेवण्यात आले. कालांताराने दोन्ही नेते पोहोचले परंतु तोपर्यंत विमानातील अन्य प्रवाशांचा पारा चांगलाच चढला होता.
या दोन्ही नेत्यांनी विमानात बसण्याचा प्रयत्न केला असता संतप्त प्रवाशांनी त्यांना विमानात येण्यासच मज्जाव केला. या वेळी मलिक आणि काही प्रवाशांमध्ये चांगलीच जुंपली. या चकमकीचे चित्रीकरण करण्यात आले आणि ती फीत स्थानिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात आली. मलिकसाहेब, माफ करा, तुम्ही परत जा, तुम्ही अन्य प्रवाशांची माफी मागितली पाहिजे, तुमच्यामुळे २५० प्रवासी तिष्ठत राहिले याची तुम्हालाच लाज वाटली पाहिजे, असा हल्ला प्रवाशांनी चढविला. दरम्यान, मलिक आणि डॉ. वकवाणी यांच्यामुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्याच्या वृत्ताचा पीआयएचे प्रवक्ते महसूद ताजवर यांनी इन्कार केला.