जेरुसलेमविषयी वक्तव्यावरून असंतोष; पॅलेस्टाइनमधील निदर्शनांत एकाचा मृत्यू

जेरुसलेमला इस्रायलची राजधानी करण्यात यावे या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचे अरब आणि मुस्लीम जगतात संतप्त पडसाद उमटले आहेत. तसेच या प्रश्नावरून इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये एक जण ठार झाला असून २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

इस्रायलमधील जेरुसलेम या शहराच्या ताब्यावरून इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये वाद आहे. मुस्लीम, ख्रिश्चन आणि ज्यू अशा तिन्ही धर्मीयांसाठी हे शहर पवित्र असल्याने तिन्ही धर्माच्या अनुयायांना त्यावर नियंत्रण हवे आहे. त्यातून आजवर मोठा संघर्ष झडलेला आहे. या पाश्र्वभूमीवर ट्रम्प यांच्या घोषणेमुळे आगीत तेल ओतल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

अमेरिकेच्या काही मित्रदेशांसह अरब आणि जगभरच्या मुस्लीम देशांतून आणि समुदायांकडून ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. जॉर्डन, इजिप्त, इराक, तुर्कस्तान, टय़ुनिशिया, इराण, मलेशिया, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया या देशांसह जम्मू-काश्मीरमध्येही मुस्लिमांनी या वक्तव्याच्या निषेध केला.

पॅलेस्टाइनच्या पश्चिम तीर आणि गाझापट्टीतही यावरून मोठी निदर्शने झाली. निदर्शकांमधील संघर्ष आणि पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत एक नागरिक मारला गेला तर २०० हून अधिक जण जखमी झाले. बेथलहेम, रामल्ला, हेब्रॉन, नेब्लस या शहरांतही हिंसाचार उसळला. निदर्शकांनी इस्रायल आणि अमेरिकेचे झेंडे जाळले, अमेरिका आणि ट्रम्पविरोधी घोषणा दिल्या. त्यांना पांगवण्याठी पोलिसांना आणि सुरक्षा दलांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.