गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये एका पत्नीने आपल्या पतीला जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पतीने विजेचे बील न भरल्याने घरामध्ये डासांनी हौदोस घातला होता त्याच रागातून महिलेने ही मारहाण केल्याचे समजते. भूपेंद्र लेउया असं या पीडित पतीचं नाव असून त्याला मारहाण करण्यामध्ये त्याच्या मुलीचाही सहभाग असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ही हणामारीची घटना घडली. भूपेंद्र यांची पत्नी संगीता आणि मुलगी चितल यांनी घरातील पंखा बंद असल्याची तक्रार केली. पंखा बंद करुन झोपावे लागत असल्याने रात्री खूप डास चावतात आणि त्यामुळे व्यवस्थित झोप लागत नाही अशी तक्रार या दोघींनी भूपेंद्र यांच्याकडे केली. मात्र याकडे फारसं गांभीर्याने लक्ष न देता ‘झोप नसेल लागत तर माझ्या बिछान्यावर येऊन झोपली असतील,’ असं उत्तर भूपेंद्र यांनी दिलं. आधीच रात्रभर डास चावलण्याने अपूर्ण झोपेमुळे वैतागलेल्या संगीता यांच्या रागाचा पार चढला आणि त्यांनी भूपेंद्र यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भूपेंद्र यांच्या मुलीनेही आईची साथ देत कपडे धुण्याच्या धोक्याने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भूपेंद्र यांच्या आरडाओरडीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी भूपेंद्र यांच्या भावाला म्हणजेच महेंद्र यांना बोलवलं. महेंद्र यांनी घरामध्ये जाऊन मायलेकींना थांबल्यानंतरच भूपेंद्र यांची सुटका झाली.

महेंद्र यांनी पत्नी आणि मुलीच्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या भूपेंद्र यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या उजव्या डोळ्यावर सात टाके घालण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. भूपेंद्र यांनी पत्नी आणि मुलीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भूपेंद्र हे मागील काही महिन्यांपासून त्यांच्या कारमधून एलइडी लाईट्सची विक्री करतात. त्याचे आर्थिक उत्पन्न कमी असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी वीजबिल भरलं नाही. म्हणूनच त्यांच्या घरातील वीज कापण्यात आली होती. यामुळेच त्यांची पत्नी आणि मुलगी त्रस्त झाले होते. त्यातूनच हा प्रकार घडला.