केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांना विमानतळावर एका महिलेने व्हीव्हीआयपी कल्चरवरुन चांगलेच सुनावले. इंफाळच्या विमानतळावर ही घटना घडली. कन्नानथनम यांना व्हीव्हीआयपी कल्चरवरुन सुनावणारी महिला डॉक्टर असून तिला एका रुग्णावर उपचार करण्यासाठी तातडीने जायचे होते. मात्र कन्नानथनम यांच्या विमानामुळे महिला डॉक्टरच्या विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने विमानतळावरच कन्नानथनम यांना खडे बोल सुनावले.

इंफाळ विमानतळावर कन्नानथनम यांचे विमान उतरत असल्याने डॉ. निराला यांच्या विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला. निराला इंफाळहून पाटण्याला जात होत्या. तिथून त्यांना दुसऱ्या विमानातून प्रवास करायचा होता. एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लवकरात लवकर पोहोचायचे होते. मात्र कन्नानथनम यांच्या विमानाला उशीर झाल्याने महिला डॉक्टरच्या विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला. यामुळे संतापलेल्या निराला यांनी कन्नानथनम यांना व्हीव्हीआयपी कल्चरवरुन सुनावले. यापुढील विमानाला विलंब होणार नाही, याची लेखी हमी देण्याची मागणी त्यांनी कन्नानथनम यांच्याकडे केली.

इंफाळमधून विमान उड्डाणास उशीर झाल्याने निराला यांना पुढील विमान मिळाले नाही. त्याआधी निराला यांनी इंफाळ विमानतळावर व्हीव्हीआयपी कल्चरला विरोध दर्शवणाऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळातील कन्नानथनम यांना सुनावले. यावेळी मंत्र्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘पुढील विमानाच्या उड्डाणाला उशीर होईल का, याबद्दल मला माहिती नाही,’ असे कन्नानथनम यांनी महिला डॉक्टरला सांगितले.