22 April 2019

News Flash

राफेल खरेदीच्या घोषणेआधीच अनिल अंबानींची फ्रान्सभेट

५८ हजार कोटींच्या या खरेदी व्यवहारात अंबांनींच्या कंपनीला ३० हजार कोटींची दलाली मिळाल्याचा आरोप आहे. 

उद्योगपती अनिल अंबानी

सुशांत सिंग, एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेच्या १५ दिवस आधी उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसच्या हाती आली आहे.

फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्याच्या घोषणेच्या १५ दिवस आधी, म्हणजे मार्च २०१५च्या चौथ्या आठवडय़ात उद्योगपती अंबानी यांनी फ्रान्सचे तत्कालीन संरक्षणमंत्री जाँ-येवेस ली ड्रायन यांच्या पॅरिसमधील कार्यालयात जाऊन तेथील उच्चपदस्थ सल्लागारांशी बैठक घेतली. या बैठकीला ली ड्रायन यांचे विशेष सल्लागार जाँ-क्लॉद मॅलेट, त्यांचे उद्योग सल्लागार ख्रिस्तोफ सालोमन आणि औद्योगिक व्यवहारांचे तांत्रिक सल्लागार जॉफ्री बुकॉट उपस्थित होते. ही बैठक गोपनीय आणि तातडीची सूचना देऊन बोलावण्यात आली होती, असे सालोमन यांनी एका युरोपीय संरक्षण कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला सांगितले होते.

या बैठकीबाबत माहिती दिलेल्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अंबानी यांनी व्यावसायिक आणि संरक्षण अशा दोन्ही प्रकारच्या हेलिकॉप्टर्सच्या संबंधात ‘एअरबस हेलिकॉप्टर्स’सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात एक सामंजस्य करार- ‘मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग’ तयार होत असून, पंतप्रधानांच्या भेटीत त्यावर स्वाक्षरी केली जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती, असे कळते.

अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाला भेट दिली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते ११ एप्रिल २०१५ या कालावधीत फ्रान्सचा अधिकृत  दौरा करतील हे  स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे या दौऱ्यात पंतप्रधानांच्या प्रतिनिधीमंडळात अंबानींचा समावेश होता. याच भेटीत मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ३६ राफेल विमानांच्या खरेदीव्यवहाराची घोषणा केली होती. योगायोग म्हणजे ही बैठक झाली त्याच आठवडय़ात, २८ मार्च २०१५ रोजी ‘रिलायन्स डिफेन्स’चा समावेश या व्यवहारात करण्यात आला.  या संदर्भात ली ड्रायन यांच्या अधिकृत प्रवक्त्याला गेल्या आठवडय़ात पाठवलेल्या ई-मेलला त्यांनी काहीही प्रतिसाद दिलेला नाही. अंबानी यांच्या रिलायन्स समूहाला पाठवलेल्या ई-मेलनाही त्यांनी काहीही उत्तर दिलेले नाही.

पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यापूर्वी म्हणजे ८ एप्रिल २०१५ रोजी संरक्षण सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकारांना माहिती देताना संभाव्य राफेल खरेदी व्यवहाराबाबत फारशी माहिती दिली नव्हती.

हिंदुस्थान एॅरोनॉटिकल लिमिटेड (एचएएल) ही सरकारी कंपनी १०८ राफेल विमान निर्मिती कंत्राटातील अधिकृत कंपनी होती, परंतु नंतर झालेल्या व्यवहारात या कंपनीचा सहभाग नव्हता.  राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या दसाँ एव्हिएशनसाठी अनिल अंबानींचा रिलायन्स समूह हा या व्यवहारातील महत्वाचा भागीदार होता. फ्रान्स आणि भारत यांच्या झालेल्या या सुमारे ५८ हजार कोटींच्या या खरेदी व्यवहारात अंबांनींच्या कंपनीला ३० हजार कोटींची दलाली मिळाल्याचा आरोप आहे.

अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाला भेट दिली, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते ११ एप्रिल २०१५ या कालावधीत फ्रान्सचा अधिकृत दौरा करतील हे  स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे या दौऱ्यात पंतप्रधानांच्या प्रतिनिधीमंडळात अंबानींचा समावेश होता.      

First Published on February 12, 2019 3:54 am

Web Title: anil ambani visit to france just before rafale deal announcement