News Flash

अनिल अंबानींच्या रिलायन्सचा एनडिटीव्हीविरोधात 10 हजार कोटींचा दावा

राफेल करारासंदर्भात मानहानीकारक बातम्या केल्याचा एनडीटिव्हीविरोधात दावा

एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीविरोधात अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहानं अहमदाबाद न्यायालयामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध हाइप या कार्यक्रमामुळे मानहानी झाल्याचा दावा करत 10 हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी रिलायन्सनं केली आहे.

एनडीटिव्ही समूहाच्या सीईओ सुपर्णा सिंह यांनी, आम्हाला त्रास देण्यासाठी व घाबरवण्यासाठी हा दावा ठोकण्यात आल्याचे ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. आम्ही या विरोधात लढणार असून प्रसारमाध्यमांना त्यांचं काम करू न देण्यासाठीच दावा ठोकण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. या प्रकरणावर रिलायन्स समूहाच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा बोलावण्यात आले, त्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले, परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे सुपर्णा यांनी म्हटले आहे.

एनडीटिव्हीच नाही तर सगळ्यांनी राफेल करारासंदर्भात बातम्या दिल्या असूनही केवळ एनडीटिव्हीलाच नोटिस पाठवण्यात आल्याचे कंपनीनं म्हटले आहे. भाजपाशासित केंद्र सरकार फ्रान्सच्या दासूकडून 58 हजार कोटी रुपयांना राफेल ही लढाऊ विमानं घेत आहे. या करारामध्ये अनिल अंबानी यांच्या कंपनीशी दासूला करार करावा लागण्याच्या अटीवरून रणकंदन पेटले आहे. या करारामुळे भाजपानं अनिल अंबानींची 30 हजार कोटी रुपयांची धन केल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनीही केला आहे. आत्तापर्यंत राजकीय मंचावर लढले गेलेले राफेल वॉर आता या बदनामीच्या दाव्यामुळे कोर्टात गेले आहे. तिथं काय यु्क्तिवाद होतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 2:44 pm

Web Title: anil ambanis reliance sues ndtv for 10000 crore
Next Stories
1 चीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र!
2 सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात
3 नोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार
Just Now!
X