देशातील तीन ठिकाणच्या आयआयटी संचालकांच्या निवडीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अवलंबिलेल्या प्रक्रियेवर ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर यांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मला चुकीच्या गोष्टींमध्ये भागीदार व्हायचे नव्हते त्यामुळे मी आयआयटीच्या गव्हर्नन्स मंडळाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काकोडकर यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. काही महिन्यांपूर्वी भुवनेश्वर आणि रोपार येथील आयआयटी संस्थांच्या संचालकांच्या निवडीवरून डॉ. काकोडकर आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयात वाद निर्माण झाले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या मंडळाच्या अध्यक्ष आहेत. त्यावेळी काकोडकर यांनी गव्हर्नन्स मंडळाच्या कारभारावर टीका करत १२ मार्च रोजी मंडळाचा राजीनामा दिला होता.
संचालकांच्या निवडीसाठी सध्या सुरू असलेली प्रक्रिया मनुष्यबळ मंत्रालयाने फारशी गांभीर्याने घेतलेली नाही. आयआयटी संचालकपदासारख्या महत्त्वपूर्ण निवडप्रक्रियेत मंत्रालय निष्काळजीपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेत निवडीसाठीचे निकष गुंडाळण्यात आले असून हा प्रकार म्हणजे लॉटरी पद्धतीने निवड करण्यासारखा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा गव्हर्नन्स मंडळावर रुजू होण्याचा मंत्रालयाचा प्रस्तावही धुडकावून लावला.