पंजाबमधील मोहाली शहरात सहा महिन्याच्या कुत्र्याच्या पिल्लाची इसमाने रॉडने मारहाण करत हत्या केली आहे. हा प्रकार घडण्याआधी या इसमाने कुत्र्याच्या पिल्लाला रेबीज झाल्याची अफवा पसरवली होती. मोहालीमधील सोहाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, गुरप्रीत सिंह असं या आरोपीचं नाव आहे. परिसरात कचरा गोळा करण्याचं काम करणाऱ्या हरप्रताप सिंह व्यक्तीने या घटनेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

“कुत्र्याच्या पिल्लाला रेबीज झाल्याची अफवा पसरवल्यानंतर गुरप्रीतने शेजारी पडलेल्या लोखंडाच्या पाईपने पिल्लाच्या डोक्यावर फटका मारला. हा फटका इतका जोरात होता की या पिल्लाचा जागच्या जागी मृत्यू झाला.” या घटनेनंतर गुरप्रीतने या पिल्लाला जमिनीत पुरण्याचाही प्रयत्न केला. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. दरम्यान दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुरप्रीत सिंहविरोधात भारतीय दंड संहितेच्या ४२९, ४२८ आणि २०१ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.