हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेलं असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं आहे. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर प्रतिक्रिया देताना चकमक करण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलं आहे.

अजंली दमानिया यांनी म्हटलं आहे की, “या घटनेनंतर द्विधा मनस्थिती आहे. बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहे, परंतु कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला पाहिजे होती. चकमक करण्याची पद्धत चुकीची आहे”.

पीडितेच्या कुटुंबाने या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून चकमकीची बातमी ऐकून धक्का बसला, मात्र आमच्या मुलीला लवकर न्याय मिळाल्याचा आनंद असल्याचं म्हटलं आहे. पीडितेच्या बहिणीने सांगितलं आहे की, “सर्व आरोपी मारले गेले आहेत याचा आनंद आहे. या घटनेमुळे एक उदाहरण सर्वांसमोर उभं राहील. मी पोलिस आणि मीडियाचे दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानते”. पीडितेच्या वडिलांनीही तेलंगणा पोलिसांचे आभार मानले आहेत. “तिच्या आत्म्याला आता शांती मिळाली असेल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आणखी वाचा- #HyderabadEncounter : नेमके घटनास्थळी काय घडले?

नेमकं काय झालं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं. अशी माहिती सायबरादाबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण ?
तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

आणखी वाचा- #HyderabadHorror: आरोपींनी तोंड दाबून ठेवल्याने मदतही मागू शकली नाही तरुणी, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

स्कुटी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घेऊन गेले होते
२७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचं पाहिलं होतं. यानंतर आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झालं असल्याचं तिने पाहिलं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. पीडित तरुणी पंक्चर झाल्यामुळे चिंतेत होती. यावेळी एक आरोपी मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत काही दूर घेऊन गेला. यानंतर पीडित तरुणीवर जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

चार आरोपींना अटक
तेलंगण पोलिसांना याप्रकरणी चार आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला होता. पोलिसांनी सांगितलं होतं की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.