तमिळनाडूतील सत्तारूढ अभाअद्रमुकने २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी आघाडी कायम राहणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत विजय मिळवून अभाअद्रमुक विजयाची हॅटट्रिक करेल, असा विश्वासही पक्षाने व्यक्त केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अभाअद्रमुकचे ज्येष्ठ नेते के. पलानीस्वामी आणि ओ. पन्नीरसेल्वम यांनी एका शासकीय कार्यक्रमात आघाडी कायम राहणार असल्याची घोषणा केली. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या आघाडीला राज्यातील ३९ पैकी केवळ एकच जागा जिंकता आली होती.

गृहमंत्री शहा चेन्नईच्या रस्त्यावर

चेन्नई : देशाचे गृहमंत्री अमित शहा शनिवारी चेन्नई भेटीत समर्थकांचा उत्साह पाहून सगळे शिष्टाचार व नियम मोडून गाडीतून रस्त्यावर उतरले व त्यांनी काही अंतर चालत जाऊन स्वागताचा स्वीकार केला. जीएसटी रस्त्यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी ते समर्थकांचा उत्साह पाहून गाडीतून उतरले. विमानतळाच्या बाहेर त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. शहा हे दोन दिवस चेन्नईच्या दौऱ्यावर असून त्यांनी अपार प्रेमाबद्दल समर्थकांचे आभार मानले. ते म्हणाले की, तामिळनाडूत आल्यानंतर खूप आनंद वाटतो आहे. शहा हे तामिळनाडू सरकारच्या एका कार्यक्रमास उपस्थित राहून चेन्नई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील ६७ हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनेची कोनशिला बसवणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील.