माझ्या आगामी आंदोलनातून पुन्हा नवे केजरीवाल निर्माण व्हायला नकोत, अशी अशा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. मंगळवारी आग्रा येथील शहीद स्मारक येथे सभेनंतर अण्णा हजारे माध्यमांशी बोलत होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांनी हजारे यांच्या २०११ मधील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात भाग घेतला होता. या आंदोलनामुळे केजरीवाल यांची राष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर याचा फायदा करुन घेताना त्यांनी आम आदमी पार्टी नावाचा पक्षही स्थापन केला होता.

दरम्यान, पुन्हा नवे केजरीवाल नको अशी भूमिका अण्णा हजारे यांनी स्पष्ट केली आहे. हजारे म्हणाले, देशाची राजधानी दिल्लीत २३ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. जनलोकपाल कायद्याची अंमलबजावणी न केल्याबद्दल मागच्या काँग्रेसप्रणित आघाडी सरकारला हजारे यांनी जबाबदार धरले. तसेच त्यानंतर मोदी सरकारने या विधेयकातील तरतुदी गाळल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी ८० वर्षीय अण्णा म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आपण उद्याप खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, लोकशाही राबवू शकलेलो नाही. आम्हाला मोदी, राहुल यांचे भांडवलदारांचे सरकार नको आहे. आम्हाला जनतेच्या कल्याणासाठी काम करणारे सरकार हवे आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाला त्यांनी नाकारले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांतून जनआंदोलन उभारल्याचा संस्थेचा दावाही त्यांनी खोडून काढला.