देशात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा एकदा जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरु असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथे दिली. या आंदोलनाला जनतेने साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. ‘इंडिया टीव्हीने’ याबाबत वृत्त दिले आहे.

देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी अण्णा हजारे यांनी केला. ते म्हणाले, २०११ मधील आंदोलनानंतर काँग्रेसप्रणित आघाडी सरकारने लोकपाल कायदा मंजूर केला. मात्र, तो काहीसा कमकुवत असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर नवे सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील जनतेला मोठ्या आशा होत्या. मात्र, गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने लोकपाल-लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी तर केली नाहीच मात्र, भ्रष्टाचार रोखण्यासाठी कुठलेच पाऊल उचलले नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

उलट सत्ताधारी एनडीए सरकारने लोकपाल कायद्यातील कलम ४४ मध्ये बदल केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे हा कायदा आणखीनच कमकुवत झाल्याचे अण्णा म्हणाले. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधातील चळवळ पुन्हा सुरु करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  या पार्श्वभूमीवर नव्या सत्याग्रहाची घोषणा करताना या आंदोलनात लोकपाल-लोकायुक्त कायदा, शेतकऱ्यांसाठीच्या एम. एस. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी त्याचबरोबर निवडणुकीतील कोटा आणि निवडणूक प्रक्रियेतील सुधारणा या बाबींचा समावेश असणार आहे.

यापुढील टप्प्यातील जनआंदोलनात सहभागी होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमांतून आंदोलनातील मुद्द्यांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यात येणार आहे. जनतेने यासाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

भ्रष्टारचारमुक्त भारतासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करताना लवकरच नव्या आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे अण्णा हजारे म्हणाले. मात्र, या आंदोलनाला जनतेने मागच्या वेळेप्रमाणे मोठा प्रतिसाद द्यावा अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.