मी समाजाच्या हितासाठी आंदोलन करतो, माझ्या आंदोलनातून यापुढे नेते निर्माण होणार नाहीत याची मी तुम्हाला खात्री देतो असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. जनलोकपाल आंदोलनाच्या वेळी मी काहीसा सावध नव्हतो. यापुढे माझ्या आंदोलनात कोणत्याही व्यक्तीला सहभागी होता येईल. मात्र आंदोलन झाल्यावर कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होणार नाही हे त्या व्यक्तीला लेखी कराराने लिहून द्यावे लागेल असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

जनलोकपाल आंदोलनाचा लढा संपलेला नाही त्याचमुळे अण्णा हजारे हे २३ मार्च २०१८ पासून पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करणार आहेत. २३ मार्चला जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनाबाबत अण्णा हजारे माहिती देत होते. त्याचवेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या यावेळच्या आंदोलनातूनही अरविंद केजरीवालसारखे काही नेते देशाला मिळणार का? याच प्रश्नाला उत्तर देताना माझ्या आंदोलनातून यापुढे नेते निर्मिती होणार नाही अशी घोषणा अण्णा हजारे यांनी केली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

निवडणूक चिन्ह आणि पक्षाचा आधार न घेता उमेदवारांनी त्यांच्या सामाजिक प्रतिमेच्या जोरावर निवडणूक लढवावी यासाठीही मी आग्रही आहे असेही अण्णा हजारेंनी म्हटले आहे. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये भारतीय मतदार संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छ राजकारण आणि अपराधमुक्त भारत या विषयावर त्यांनी त्यांची मते मांडली. आजकाल राजकीय पक्षांपुढे फक्त सत्ता काबीज करणे हा एकमेव अजेंडा आहे. आपल्या संविधानात निवडणूक चिन्हाचा उल्लेख नाही मग ते निवडणूक व्यवस्थेत कसे आले? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ज्येष्ठ सामाजिक अण्णा हजारे यांनी यूपीए सरकारच्या काळात जनलोकपाल विधेयकासाठी देशव्यापी चळवळ उभी केली होती. हे आंदोलन संपल्यावर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी हा पक्ष काढला. तसेच याच पक्षाने दिल्लीची सत्ताही मिळवली. ही बाब अण्णा हजारे यांना मुळीच रूचलेली नाही. त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. आता  मात्र आगामी काळात माझ्या आंदोलनातून नेते निर्मिती होणार नाही, तसा करारच मी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांकडून करून घेणार आहे असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.