‘दुसरी क्रांती..काळे इंग्रज..’च्या जुन्या घोषणा. डोक्यावर ‘अन्ना समर्थक’ अशी टोपी असलेल्या दोनेकशे जणांचा समूह.. एका व्यासपीठावर अण्णा हजारे तर शेजारी  आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विविध संघटनांच्या प्रमुखांनी ओसंडून वाहणारे दुसरे व्यासपीठ..हे चित्र आहे जंतर-मंतरवरचे. केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे यांनी दोनदिवसीय आंदोलन आरंभिले आहे. अण्णांच्या मागील आंदोलनांच्या तुलनेत कमी गर्दी झालेल्या ‘जंतरमंतर’वर यंदा ‘अन्ना रिटर्नस्’ हे मोठे पोस्टर सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. अण्णांचा आक्रमकपणा मात्र तसाच कायम दिसला. मोदी सरकार इंग्रजांपेक्षाही अन्यायी आहे, अशा घणाघाती शब्दात अण्णा हजारे यांनी सरकारवर हल्ला चढवला.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या आश्वासनावर अण्णा हजारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भ्रष्टाचार कमी झाला नाही. उलट गेल्या नऊ महिन्यांत वाढल्याचे सांगून हजारे यांनी मोदींच्या आश्वासनांमधील हवाच काढून टाकली. जमीन अधिग्रहण कायद्यातील सुधारणा शेतकरीविरोधी आहेत. शिवाय सरकारने अध्यादेशाद्वारे हा कायदा आणला.
त्यावर आक्षेप घेत अध्यादेश रद्द करून संसदीय कामकाजाद्वारे नवा जमीन अधिग्रहण कायदा मंजूर करण्याची मागणी हजारे यांनी केली. मोदी सरकार उद्योगधार्जिणे असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने अध्यादेशाद्वारे मंजूर केलेला कायदा रद्द करून नवा सुधारित कायदा आणावा अन्यथा आम्ही देशव्यापी आंदोलन उभे करू, असा इशारा त्यांनी दिला.
अण्णा म्हणाले की, जमीन अधिग्रहण कायद्यातील जाचक अटी अध्यादेशाद्वारे सरकारने शेतकऱ्यांवर लादल्या आहेत. सरकारने आमचे म्हणणे न ऐकल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही. येत्या दोन दिवसांत सहकारी संघटनांशी चर्चा करून लवकरच ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केली. आम आदमी पक्ष वा काँग्रेसला आंदोलनात सहभागी करण्यास विरोध असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले. भाजपच्या महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी अण्णांची आंदोलनादरम्यान भेट घेतली. शेट्टी म्हणाले की, जमीन सुधारणा कायदा शेतकरीविरोधी आहे. संसदेत या कायद्याला विरोध करणारे अल्पसंख्य असले तरी आम्ही रस्त्यावर लढा देऊन सरकारवर दबाव आणू. पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, प्रतिभा शिंदे अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणारे पी. व्ही. राजगोपाल उद्या, मंगळवारी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.

आंदोलकांची राजनाथ सिंहांशी चर्चा
पी. व्ही. राजगोपाल अध्यक्ष असलेल्या एकता परिषदेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. परिषदेचे समन्वयक रमेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या भेटीदरम्यान राजनाथ सिंह यांनी आंदोलकांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. भाजपच्या प्रमुख नेत्यांनीदेखील याच मुद्दय़ावर राजनाथ सिंह यांच्याशी रात्री उशिरा चर्चा केली.

केजरीवालही सहभागी होणार
अण्णा हजारे यांच्या आंदोलनात अरविंद केजरीवाल मंगळवारी सहभागी होणार असल्याचे आम आदमी पार्टीच्या सूत्रांनी सांगितले.