थेट अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नाराजी व्यक्त करीत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर आम आदमी पक्षाने आता सावरून घेण्यासाठी विरोधकांवर आरोपांची तोफ डागली. केजरीवाल यांच्याविरुद्ध रचण्यात आलेल्या राजकीय षडयंत्रामुळे हा व्हिडिओ आता प्रसारित करण्यात आला, असा आरोप आम आदमी पक्षाने केला.
डिसेंबर २०१२ मध्ये बंद खोलीत झालेल्या एका बैठकीत अण्णा हजारे केजरीवाल यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करीत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला. रामलीला मैदानावरील अण्णा हजारेंच्या उपोषणावेळी गोळा करण्यात आलेले तीन कोटी रुपये चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याचा आरोप या बैठकीमध्ये अण्णा हजारे यांनी केला.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जवळ आले असताना हा व्हिडिओ प्रसारित करण्यामागे विरोधकांचे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. निवडणुकीच्यावेळीच हा व्हिडिओ कसा काय प्रसारित करण्यात आला, असा प्रश्नही पक्षाने उपस्थित केला. ज्यांना आमच्याबद्दल शंका वाटत असेल, त्यांनी चौकशीची मागणी करावी. आम्ही त्यास तयार आहोत, असे पक्षाचे नेते संजय सिंग म्हणाले.
आम आदमी पक्षाच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना नैराश्य आले असल्याचा आरोप पक्षाचे आणखी एक नेते कुमार विश्वास यांनी केला.