यापूर्वीच्या दिल्ली दौऱ्यात आपले शिष्य मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र आलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे उद्या, रविवारी केजरीवाल यांना भेटणार आहेत.
कारगिल विजय दिवसानिमित्त शहीद सैनिकांच्या विधवा आणि माता यांचा गौरव करण्यासाठी उद्या आयोजित एका कार्यक्रमात हजारे सहभागी होणार आहेत. त्यानंतर रात्री नव्या महाराष्ट्र सदनात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे.
अण्णा हजारे यांना केजरीवाल तसेच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा काल दूरध्वनी आला होता. त्यावेळी, रविवारी रात्री ८ वाजता महाराष्ट्र सदनात त्यांना भेटण्या अण्णांनी संमती दिली, असे हजारे यांचे सहकारी दत्ता आवारी यांनी सांगितले.
गेल्या वेळेस भूसंपादन विधेयकाचा विरोध करण्यासाठी दिल्लीला आलेले हजारे केजरीवाल यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र आले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सचिवालयात येण्याचेही निमंत्रण दिले होते, परंतु आपण व्यस्त असल्याचे सांगून हजारे तेथे गेले नाहीत.
‘वन रँक-वन पेन्शन’ या मागणीसाठी उद्या जंतरमंतरवर आयोजित करण्यात आलेल्या माजी सैनिकांच्या निदर्शनांमध्येही हजारे सहभागी होणार आहेत.ॉ
भूसंपादन विधेयकाच्या विरोधात, तसेच वन रँक-वन पेन्शनची मागणी लावून धरण्याकरता २ ऑक्टोबरपासून दिल्लीत बेमुदत उपोषण करण्याची घोषणा हजारे यांनी यापूर्वीच केली आहे. ‘२ ऑक्टोबरला मी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसेन’, असे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वरील दोन मुद्यांबाबत लिहिलेल्या पत्रात कळवले असल्याचे त्यांनी राळेगण सिद्धी येथे पत्रकारांना सांगितले होते. आपले सैनिक व शेतकरी यांची आपण काळजी घ्यायला हवी. त्यांच्या कल्याणकारी योजनांची पोकळ घोषणा करणे आणि प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. आपले आंदोलन राजकीय नाही याचा अण्णांनी पत्रात पुनरुच्चार केला आहे.