ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून घेण्याबाबत असलेली याचिका दिल्ली न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. हजारे, केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘अण्णा एसएमएस कार्ड’ची विक्री करून फसवणूक केल्याचा आरोप दिल्लीतील रहिवासी रुमाल सिंग यांनी करीत याप्रकरणी एफआयआर नोंदवून घेण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा अहवाल सादर केल्यानंतर महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी अण्णा हजारे आणि त्यांच्या माजी सहकाऱ्यांविरोधात दाखल केलेली याचिका रद्द केली.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या आंदोलनात सक्रिय सहभाग असल्याचा दावा करणाऱ्या रुमाल सिंग यांनी म्हटले आहे की, फेब्रुवारी २०१२ मध्ये विक्रीस ठेवलेल्या अण्णा एसएमएस कार्डच्या माध्यमातून एकूणच अण्णांनी सुरू केलेल्या आंदोलनाची माहिती वर्षभर देण्यात येणार होती.  या कार्डाच्या विक्रीतून अण्णा आणि त्यांच्या माजी सहकाऱ्यांनी तब्बल १०० कोटी रुपये मिळवले होते. तसेच या कार्डाची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता वेळेआधीच बंद करण्यात आल्याचा आरोप जैन यांनी केला होता.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात मंगळवारी कृती अहवाल सादर केला. तपासादरम्यान हजारे आणि त्यांच्या माजी सहकाऱ्यांविरोधात कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नाही, तसेच याप्रकरणी याचिकाकर्त्यांने ग्राहक संरक्षण न्यायालयात दाद मागावी. मात्र  याचिकाकर्त्यांकडून चौकशीदरम्यान सहकार्य मिळत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.