सरलेले वर्ष झाकोळून टाकणाऱ्या करोनावरील लशीबाबत भारतीयांना नववर्ष प्रारंभीच आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत औषध महानियंत्रकांनी गुरुवारी दिले. सीरम इन्स्टिटय़ूटची ‘कोव्हीशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या लशींबाबत तज्ज्ञ समितीची बैठक आज, शुक्रवारी होणार असून, लसीकरणाची सराव फेरी शनिवारी देशभरात होणार आहे.

‘नववर्षांत काही तरी आपल्या हाती पडू शकेल, इतकेच मी आपल्याला सूचित करू शकतो’, असे विधान औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी गुरुवारी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या कार्यक्रमात केले. देशात लशींच्या मान्यतेसाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीच्या शुक्रवारच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जाते.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस सीरम इन्स्टिटय़ूट ‘कोव्हीशिल्ड’ नावाने उत्पादित करत असून, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि भारत बायोटेक संयुक्तपणे ‘कोव्हॅक्सीन’ची निर्मिती करत आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या लशींबाबत बुधवारी तज्ज्ञ समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. शुक्रवारी पुन्हा समितीची बैठक होणार आहे. फायझर कंपनीनेही तातडीच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. तज्ज्ञ समितीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर औषध महानियंत्रक लशींना अंतिम परवानगी देतील.

दुसरीकडे, करोना लसीकरणाची सराव फेरी शनिवारी २ जानेवारीला सर्व राज्यांमध्ये होणार आहे. राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये तीन ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येईल. महाराष्ट्र आणि केरळमध्ये राजधानींव्यतिरिक्त इतर शहरांमध्येही सराव फेरी राबवली जाऊ शकेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.

लसीकरणासंदर्भातील सर्व माहिती ‘को-विन’ अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. सराव फेरीत समोर येणाऱ्या त्रुटींचा अभ्यास करून लसीकरण प्रक्रियेत आवश्यक बदल करण्यात येतील. या सराव फेरीत लसीकरणाची सर्व प्रक्रिया राबवली जाईल. २५ लाभार्थीची निवडही करण्यात येईल. फक्त लस दिली जाणार नाही.

देशातील करोना लसीकरण मोहीम ही जगभरातील सर्वात मोठी प्रक्रिया असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. लसीकरणासाठी देशभरात आतापर्यंत ९६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

आधी चाचपणी..

पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश आणि आसाम या चार राज्यांमध्ये २८ व २९ डिसेंबरला लसीकरणाची सराव फेरी घेण्यात आली होती. या राज्यांमधील अनुभवांचा आढावा घेतल्यानंतर देशव्यापी सराव फेरीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. शनिवारी प्रत्येक राज्याच्या राजधानीत सराव फेरी होणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांत सराव फेरी होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणत्या अडचणी येऊ  शकतात, हे प्रामुख्याने सराव फेरीत तपासले जाईल.

चीनची लशीला मान्यता; मोफत लसीकरण

बीजिंग : चीनने करोनावरील पहिल्या देशी लशीला गुरुवारी सशर्त मान्यता दिली. सरकारी मालकीच्या ‘सिनोफार्म’ने विकसित केलेली ही लस देशातील सर्व नागरिकांना मोफत देण्यात येईल, अशी घोषणाही चीनने केली. चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर लशीची परिणामकारकता ७९.३४ टक्के आढळल्याचे कंपनीने नुकतेच जाहीर केले होते.

‘दवाई भी, कडाई भी’

नवी दिल्ली : देशात लसीकरणाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ अशी सूचना मी याआधी केली होती. मात्र आता ‘दवाई भी, कडाई (सावधगिरी) भी’ असा नववर्षांचा नवमंत्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी म्हणाले. राजकोट येथील नव्या ‘एम्स’चा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झाला. त्या वेळी ते बोलत होते.