मेट्रोला मुभा, उपनगरीय रेल्वे बंदच; टाळेबंदी शिथिलीकरणाचा चौथा टप्पा जाहीर

केंद्रीय गृहमंत्रालयाने टाळेबंदी शिथिलीकरणाचा चौथा टप्पा शनिवारी जाहीर केला. त्यानुसार ३० सप्टेंबपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार असली तरी ९वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या लेखी परवानगीने शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत जाण्याची मुभा दिली जाऊ शकते. त्यामुळे काही शैक्षणिक घडामोडी २१ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ वा राज्य कौशल्य विकास योजनेअंतर्गत होणारे प्रशिक्षण वर्ग या संस्थाही पुन्हा सुरू होतील. प्रयोगशाळांची गरज असलेले तांत्रिक आणि व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि संशोधन (पीएचडी) संस्थांनाही मुभा देण्यात येईल. या शैक्षणिक घडामोडी सुरू करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य सूचना प्रसिद्ध केल्या जातील.

टाळेबंदीच्या शिथिलीकरणाचा तिसरा टप्पा ३१ ऑगस्ट रोजी संपत असल्याने चौथ्या टप्प्यासाठी गृहमंत्रालयाने नव्या मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक घडामोडींची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. करोनामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत टाळेबंदी कायम राहणार आहे. केंद्राने पहिल्या तीन शिथिलीकरणातील सवलतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नियंत्रित विभागांमध्ये कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी नसेल. उपनगरीय रेल्वेला परवानगी देण्यात आली नसली तरी मेट्रो रेल्वेसेवा मात्र ७ सप्टेंबरपासून सुरू होईल.

टाळेबंदी आता केंद्रच ठरवणार..

नियंत्रित विभागांच्या बाहेर राज्यांना केंद्राशी चर्चा न करता परस्पर स्थानिक पातळीवर टाळेबंदी लागू करता येणार नाही. अनेक राज्यांमध्ये स्थानिक प्रशासन दोन-पाच दिवसांची तात्पुरती टाळेबंदी लागू करत आहे. या अनियमित टाळेबंदीला केंद्राने मनाई केली आहे. राज्याअंतर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीस ई-पासची गरज नाही. वस्तूंची वाहतूक आणि व्यक्तींना विनाअडथळा प्रवास करता येऊ  शकेल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

शाळांबाबत..

विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्याची २१ सप्टेंबरपासून परवानगी असेल. ५० टक्के शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला शाळा-महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहता येईल. ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवला जाईल, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.

कार्यक्रमांना सशर्त परवानगी.. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील सार्वजनिक कार्यक्रमांना २१ सप्टेंबरपासून मुभा देण्यात आली आहे. या समारंभांना फक्त १०० व्यक्तीच उपस्थित राहू शकतील. खुल्या सभागृहांतील कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात आली आहे. मुखपट्टी, अंतर नियमासह अन्य निर्बंधांचे पालन करूनच सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी होता येईल. नाटय़गृहे, चित्रपटगृहे, तरण तलाव आदी बंदच राहतील.