राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी आघाडी करून भाजपने सत्ता बनवण्याच्या प्रयत्नामुळे संघ प्रचारकांमध्ये मात्र नाराजी निर्माण झाली आहे. भाजपने असंगाशी संग कशासाठी करायचे, असा प्रश्न या प्रचारकांना पडलेला आहे.
गेली तीस वर्षे शिवसेनेशी भाजपने ती केलेली होती. हिंदुत्वाचा धागा दोन्ही पक्षांना एकत्र बांधणारा असताना भाजपने शिवसेनेशी जुळवून घ्यायला हवे होते, असे या प्रचारकांचे म्हणणे आहे. शिवसेनेशी असलेली जुनी मैत्री टिकायला हवी, अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली आहे. सरसंघचालकांची भूमिका लक्षात घेऊन तरी भाजपने युती तोडणे योग्य नव्हे, असा सूरही व्यक्त होत आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी सत्तेत आली तर पुढील दहा वर्षे तरी सत्ता मिळणार नाही, अशी भीती प्रदेश भाजपला वाटत असल्याने संघाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवाय, काँग्रेस आघाडी आणि शिवसेना काही करून पाच वर्षे सत्ता टिकवतील अशी खात्री प्रदेश भाजपच्या नेत्यांना होऊ लागली होती, असेही संघ प्रचारकांनी सांगितले.
निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात भाजपच्या नेत्यांनी तोफ डागली होती. अजितदादांची जागा आर्थर रोड तुरुंगात असल्याचीही भाषा केली होती. मग, सरकार स्थापन करणे कितपत योग्य आहे, असा सवाल संघात केला जात आहे. या मुद्दय़ाबाबत संघाचे अभ्यासक दिलीप देवधर म्हणाले की, प्रत्यक्ष लोकांमध्ये काम करणाऱ्या प्रचारकांच्या मनात नाराजी निर्माण होऊ शकते. भाजपच्या कृतीचे उत्तर प्रचारकांना लोकांना द्यावे लागत असेल. त्यामुळे फडणवीस-अजित पवार युती त्यांना योग्य वाटली नसावी.
भाजपच्या सत्तास्थापनेच्या प्रक्रियेबद्दल संघाच्या निर्णयप्रक्रियेतील वर्तुळात नेमका काय विचार केला जाऊ शकतो, या मुद्दय़ावर देवधर म्हणाले की, संघ नेहमीच बेरजेचे गणित मांडतो. त्याआधारेच संघाने स्वत:चा विस्तार केला आहे. संघाच्या बाहेरील लोकांचे संघात स्वागत केले जाते. वाल्याचा वाल्मीकी होतोच. एखादी व्यक्ती संघात आली की तिला वाल्मीकी बनण्याची संधी दिली जाऊ शकते असे संघ मानतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 25, 2019 12:44 am