समाजकंटकाकडून पुतळ्यांची तोडफोड करण्याचं लोण संपूर्ण भारतात पसरत असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात आला. डॉ. बाबासाहेबांच्या 127 व्या जयंतीच्या एक दिवसाअगोदर ग्रेटर नोयडामध्येही अशीच घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच सरदारपूर गावात काही समाजकंटकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. उत्तर प्रदेश पालिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. तसेच जुन्या पुतळ्याच्या जागी नवीन पुतळासुद्धा बसवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरदारपूर गावातील आंबेडकर पार्कमध्ये ही घटना घडली असून हा पुतळा २५ वर्षे जुना होता. या घटनेमुळे सरदारपूर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी उत्तर प्रदेश पालिसांनी अतिरिक्त पोलीस दल गावात तैनात करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक सुनीती सिंग यांनी दिलेल्या माहीतीनुसार, या घटनेची बातमी पसरल्यानंतर जवळपासच्या गावांतून अनेक लोकांचा जमाव घटनास्थळी जमा झाला. परंतू पोलिसांनी परिस्थिती योग्यरितीने हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेशातील मेरठ येथेही चार ते पाच अज्ञात समाजकंटकांकडून दगड मारून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.