दुसऱ्या जातीतील तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्याची शिक्षा म्हणून जात पंचायतीच्या आदेशावरून एका आदिवासी तरुणीवर १३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यात घडली. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली असली तरी या घटनेनंतर देशभरात जात पंचायतींविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
जात पंचायतींकडून दिले जाणारे अन्यायकारक आदेश आणि शिक्षा यावरून समाजात तीव्र नाराजी असतानाच बिरभूम जिल्ह्यामधील लाभपूर येथील घटनेने जात पंचायतींच्या क्रूर कारभाराची परिसीमा गाठली आहे. या गावातील एका आदिवासी तरुणीचे समाजाबाहेरील तरुणाशी प्रेमसंबंध होते. हे संबंध तोडण्यास तिने नकार दिल्याने सालिशी सभा या जात पंचायतीने मंगळवारी या मुलीला एका खोलीत कोंडले व सदर मुलाला दंड म्हणून सकाळपर्यंत २५ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले. त्यानंतर रात्री पंचायतीच्या प्रमुखाच्या आदेशावरून १३ जणांनी या मुलीवर बलात्कार केला. मुलीच्या कुटुंबाने तक्रार केल्यानंतर १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  तिचे ज्या युवकाशी संबंध होते त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या युवकाला कोणत्या आरोपाखाली अटक करण्यात आली ते समजू शकलेले नाही. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिरभूमचे पोलिस अधीक्षक सी. सुधाकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वच स्तरांतून निषेध
पश्चिम बंगालचे राज्यपाल, एम.के.नारायणन् यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल रॉय यांनी या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्या सर्व दोषींना अटक करण्यात आली असून त्यांना कडक शिक्षा करण्यात येइल, असे आश्वासन दिले. बंगालसारख्या राज्याला असे कृत्य लांच्छनास्पद आहे, जे घडले ते दुर्दैवी, क्रूर होते, अशा शब्दांत मार्क्‍सवादी कंम्युनिस्ट पक्षाने आपला निषेध नोंदवला आहे. आदिवासी युवतीवर करण्यात आलेला सामूहिक बलात्कार हे अमानवी कृत्य असल्याचे नमूद करून केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी, आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा देण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे.