काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार सध्या ईडीच्या कोठडीत आहे. त्यांना मंगळवारी ईडीने अटक केली होती. शिवकुमार यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले आहेत. “शिवकुमार यांना करण्यात आलेली अटक म्हणजे द्वेषाच्या राजकारणाचं आणखी एक उदाहरण आहे”, अशी टीका राहुल यांनी मोदी सरकारवर केली आहे.

आर्थिक गैरव्यवहारावरुन कर्नाटकतले काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यापाठोपाठ केंद्रीय तपास यंत्रणानी अटक केलेले शिवकुमार हे दुसरे काँग्रेस नेते आहेत. शिवकुमार यांना अटक झाल्यानंतर कर्नाटक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवकुमार यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ राज्य काँग्रेसच्या वतीने बुधवारी कर्नाटक बंद पाळण्यात आला होता. त्याचबरोबर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते  सुशीलकुमार शिंदेंनी भाजपावर निशाणा साधला होता. “भाजपाला काँग्रेसचा बदला घ्यायचा आहे असेच दिसते आहे. त्याचमुळे आमच्या पक्षातल्या लोकांवर अचानकपणे कारवाई केली जाते आहे” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते.

शिंदे यांच्याबरोबरच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. शिवकुमार यांना अटक झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला. “शिवकुमार यांना झालेली अटक हे द्वेषाच्या राजकारणाचं आणखी एक उदाहरण आहे. ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा सरकार मुक्तपणे वापर करत आहे. दुर्बल माध्यमही ठरवून लक्ष्य करत आहेत”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.